महाराष्ट्र दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ई-पास काढला आहे का?; माहिती अधिकारात विचारणा


मुंबई – सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. पण आता त्यांच्या या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असून कठोर निर्बंध लावण्यात आलेले असताना देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असल्यामुळे प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचे फडणवीसांच्या दौऱ्यात उल्लघन होत असल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. तसेच या दौऱ्यासाठी फडणवीसांनी ई पास काढला आहे का? अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे.

रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावचा दौरा केला होता. फडणवीस कोपरगाव येथील आत्मा मालिक ज्ञानपीठ आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरचे उदघाटन करण्यासाठी पोहोचले होते. या दौऱ्याच्या अनुषंगाने माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे संजय काळे यांनी अर्ज केला आहे.

त्यामध्ये जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी फडणवीस यांनी नियमानुसार ई-पाससाठी अर्ज केला आहे का ? याची माहिती मागितली आहे. दहा माणसांपेक्षा जास्त गर्दी करायची नसतानाही गर्दी करण्यासाठी परवानगी घेतली होती का? असेही काळे यांनी अर्जात विचारले आहे. त्यांनी यावेळी पोलीस प्रशासन व तालुका, जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दलही विचारले आहे.


दरम्यान यावरुन मुख्यमंत्र्यांवर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असा टोला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस सध्याच्या घडीला कोकणात असून तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत.