परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, तक्रारदार पोलीस अधिकाऱ्याने दाखल केली इंटर्वेन्शन याचिका


नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी वेळी बाजू ऐकूण घेण्यासाठी पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका भीमराव घाडगे यांनी आज दाखल केली. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिग यांनी याचिका दाखल केली होती. आपल्या विरोधात अनेक प्रकरणात चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल आहे, या सर्व प्रकरणाची महाराष्ट्र सोडून इतर राज्यात चौकशी करावी आणि प्रकरण चालवावीत, अशी मागणी त्या याचिकेत केली आहे. परमबीर सिंग यांच्या या याचिकेसंदर्भात भीमराव घाडगे यांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयात लवकरच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आता पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल करत त्यांची बाजू ऐकण्याची मागणी केली आहे. परमबीर सिग यांची याचिका ऐकताना आपल्याला ही ऐकण्यात यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

परमबीर सिंग यांच्या विषयी सुरु असलेल्या प्रकरणांची दुसऱ्या राज्यात चौकशी करण्यास देखील भीमराव घाडगे यांनी विरोध दर्शवला आहे. सिंग यांची चौकशी महाराष्ट्रात झाली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. इंडिया बुल्समध्ये परमबीर सिंग यांच्या पत्नीचे कार्यालय आहे. त्यांनी तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आल्याचा आरोप भीमराव घाडगे यांनी केला आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केल्याचा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र या पोलीस अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

त्याचबरोबर भीमराव घाडगे यांनी यात परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही म्हटले आहे. पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याचा दावा भीमराव घाडगे केला आहे. तसेच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ आणि अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह तब्बल 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला गेला आहे.