सलमानच्या ‘राधे’ची केवळ चार दिवसांत डिजिटल प्लॅटफॉर्मवर 221 कोटी रुपयांची बक्कळ कमाई


१३ मे रोजी ईदच्या दिवशी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही रिलीज झालेला अभिनेता सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमाकुळ घातला आहे. चित्रपटगृह अनेक ठिकाणी बंद असल्यामुळे हा चित्रपट केवळ तीन चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला आहे. पण या चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपेक्षेपेक्षाही जास्त व्यूअरशिप मिळत आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर Pay Per View च्या आधारे अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट रिलीज करण्यात आला. हा चित्रपट झी फ्लेक्सवर एकदा पाहण्यासाठी २४९ रूपये भरावे लागतात. मीडिया ट्रेंडचा अभ्यास करणारी संस्था ओरमेक्स मीडियाच्या अहवालानुसार ‘राधे’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत 8.9 मिलियन म्हणजेच 89 लाख व्ह्यूव्ह मिळाले आहेत. याच आधारे केवळ चार दिवसांत ‘राधे’ चित्रपटाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर 221 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. यातील 4.2 मिलियन व्ह्यूव्ह तर पहिल्याच दिवशीचे आहेत. ट्रेंड जाणकारांच्या म्हणण्यानुसार डिजिटल प्लॅटफॉर्मवर पे पर व्ह्यूव्हच्या आधारे हा चित्रपट रिलीज करणे निर्मात्यांना फायद्याचे ठरले आहे.

संपूर्ण देशात केवळ तीनच चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. हे तीनही चित्रपटगृह त्रिपुरामधीलच आहेत. या चित्रपटाच्या ओपनिंग विकेंडमध्ये या तीन चित्रपटगृहातून केवळ ६० हजारांची कमाई झालेली आहे. पण ही कमाई तेथील चित्रपटगृहांमध्ये नियमांचे पालन करून काही ठराविक वेळेसाठीच चित्रपटगृह सुरू ठेवल्यानंतरची आहे.

‘राधे’ चित्रपटाच्या कमाईचा तिसरा मार्ग म्हणजे विदेशातील चित्रपटगृह असून हा चित्रपट अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलॅंड आणि मिडल ईस्टमधील सर्वच चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. या चित्रपटाने ऑस्ट्रेलियामध्ये रिलीजच्या सहा दिवसांतच जवळजवळ 2.21 कोटी रूपयांची कमाई केली आहे, तर न्यूजीलंडमध्ये जवळजवळ 42 लाख रुपये जमा केले आहेत. विदेशातील ‘राधे’ची कमाई 2 मिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. यातील 70 टक्के कमाई ही मिडल ईस्टमधील आहे.