ट्विट करत सोनू सूदचा डॉक्टरांना सवाल


कोरोना काळात लोकांचे जीव वाचवण्यासाठी ‘देवदूत’ बनून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद धडपड करताना दिसून येत आहे. या संकट काळात जे जे काम तो करत आहे, त्याबाबतची प्रत्येक अपडेट तो स्वतः त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच देत असतो. सोशल मीडियावर नुकतेच त्याने शेअर केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ माजली आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत अभिनेता सोनू सूदने डॉक्टरांना एक प्रश्न विचारला आहे. सोनूने या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, तुम्हाला एक साधा प्रश्न आहे. आपल्या सर्वांना जर हे माहित आहे की एक खास इंजेक्शन कुठेच उपलब्ध होत नाही तर मग प्रत्येक डॉक्टर्स लोकांना हेच इंजेक्शन लावण्याचा सल्ला का देत आहेत ? रूग्णालयांना जर हे इंजेक्शन मिळत नाही तर मग कुठून आणेल हे इंजेक्शन सामान्य जनता ? आपण दुसऱ्या इंजेक्शनचा वापर लोकांचे जीव वाचवण्यासाठी का करू शकत नाही ?


अभिनेता सोनूने जरी या ट्विटमध्ये इंजेक्शनचे नाव नमूद केले नसले, तरी त्याचा इशारा हा थेट रेमडेसिवीर इंजेक्शनवरच होता. सोनूने शेअर केलेले हे ट्विट काही मिनिटांतच अगदी वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहे. त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत रिट्विट केले आहे.

दिल्लीमधील एका रूग्णालयात एका कोरोनाविरोधात झुंज देणाऱ्या एका मुलीचे काही दिवसांपुर्वीच निधन झाल्यानंतर सोनू सुद अतिशय दुःखी झाला होता. रूग्णालयात असतानाचा या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही मुलगी या व्हिडीओमध्ये बेडवर ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील ‘लव्ह यू जिंदगी’चे गाणे ऐकून रमताना दिसून आली. प्रत्येक जण हा व्हिडीओ पाहून तिच्या धैर्याला सलाम करीत होता. याच मुलीची कोरोनाविरोधातील झुंज अपयशी ठरली आणि तिचे निधन झाले. रूग्णालयातील डॉक्टर मोनिका लंगेह यांनी तिच्या निधनाची माहिती दिली.


अभिनेता सोनू सूदने ही बातमी कळल्यानंतर डॉ. मोनिका लंगेह यांचे ट्विट रिट्विट करत लिहिले, अतिशय दुःखद बातमी, मी कधी विचारच केला नव्हता की ती तिच्या कुटूंबाला परत कधी पाहू शकणार नाही. जीवन खूपच अन्यायपूर्ण झाले आहे. असे किती जीवन आहेत जे जगण्यालायक आहेत, त्यांनाच गमावून बसत आहोत. आपले जगणे कितीही सामान्य किंवा सुखकर असले तरी आपण या काळातून बाहेर पडू शकणार नाही.