टूलकिटवरून रामदेव बाबा यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून साधला निशाणा


नवी दिल्ली – सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून देशात सध्या असलेल्या कोरोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असे म्हणण्याचे आवाहन करणारे एक टूलकिट काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत आहे. हे टूलकिट भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवरून शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यानंतर टूलकिट प्रकरणावरून काँग्रेसचे नाव न घेता आता योगगुरू रामदेवबाबा यांनी देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

हे करणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की ते राजकारण करू शकतात, पण हिंदूंचा अपमान करू नका. तुम्हाला हा देश माफ करणार नाही, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत. हे ट्वीट बनावट असून त्यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. पण यावरुन भाजकडून काँग्रेसवर सातत्याने यासंदर्भात टीका करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता रामदेव बाबा यांनी देखील निशाणा साधला आहे.

याबाबत एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या टूलकिटचा संदर्भ रामदेव बाबा यांनी थेट हिंदुत्वाशी जोडला आहे. टूलकिटच्या माध्यमातून कुंभमेळा आणि हिंदुत्वाचा अपमान करणे हा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कट असून तो एक अपराध आहे. अशा लोकांना माझी विनंती आहे की ते राजकारण करू शकतात, पण हिंदूंचा अपमान करू नका. तुम्हाला हा देश माफ करणार नाही. माझे अशा लोकांना आवाहन आहे की त्यांनी अशा शक्तींवर बहिष्कार टाकावा आणि विरोध करावा, असे रामदेव बाबा म्हणाले आहेत.