नितीन गडकरींची केंद्राच्या ‘या’ निर्णयाबद्दल माहिती नसल्याची जाहीर कबुली


नवी दिल्ली – आपल्या रोखठोक स्वभावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ओळखले जातात. ते नेहमीच सरकारच्या एखाद्या निर्णयावर नाराजी असो किंवा सल्ला द्यायचा असो आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. त्यांनी नुकतेच लसीकरण वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांना लसनिर्मितीसाठी परवाना देण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान यानंतर केंद्राने आधीच यासंबंधी निर्णय घेतला असून आपल्याला याची कल्पना नसल्याची कबुली दिली आहे.

ही माहिती नितीन गडकरी यांनी ट्विट करुन दिली आहे. स्वदेशी जागरण मंचकडून आयोजित परिषदेत काल बोलताना लसनिर्मिती वाढवण्यासाठी मी सल्ला दिला होता. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी माझ्या भाषणाआधीच लसनिर्मिती वाढवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली होती, याची मला कल्पना नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकार १२ वेगवेगळ्या प्लांट/कंपनींकडून लसनिर्मितीसाठी मदत घेत असून या प्रयत्नांमधून भविष्यात निर्मिती वाढण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी मला परिषदेनंतर मला कळवले, असेही नितीन गडकरींनी सांगितले आहे.

त्यांच्या मंत्रालयाने मी सल्ला देण्याआधीच प्रयत्न सुरु केल्याची मला कल्पना नव्हती. योग्य दिशेने जात असल्याबद्दल मला आनंद असून त्यांचे अभिनंदन करतो. हे रेकॉर्डवर ठेवणे मला महत्वाचे वाटते, असेही नितीन गडकरी यांनी प्रांजळपणे मान्य केले आहे.

जास्तीत जास्त कंपन्यांना लसनिर्मितीसाठी परवाना दिला पाहिजे. मागणी जर पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर समस्या निर्माण होते. एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना तसंच रॉयल्टी द्या, असं नितीन गडकरी यांनी सुचवले होते. तसेच लसनिर्मिती वाढवण्यासाठी फॉर्म्युला देशभरातील इतर प्रयोगशाळांसोबत शेअर केला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले होते.

प्रत्येक राज्यात किमान एक ते दोन अशा प्रयोगशाळा असतील ज्यांच्याकडे क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील. त्यांच्यासोबत फॉर्म्युला शेअर करा आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी समन्वय साधा. नंतर ते देशात पुरवठा करतील. निर्मिती जास्त असेल तर ते निर्यातही करु शकतील. हे १० ते १५ दिवसांत केले जाऊ शकते, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता.