भारतातील Biological E. करणार Johnson & Johnsonच्या लसीची निर्मिती


हैदराबाद – जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) या कंपनीच्या कोरोना लसीची निर्मिती भारतातील Biological E. या संस्थेकडून करण्यात येणार आहे. त्याचरोबर या कंपनीकडून त्यांच्या वेगळ्या कोरोना लसीचीही निर्मिती केली जाणार आहे. रॉयटर्सशी संवाद साधताना यासंदर्भातील माहिती Biological E. च्या कार्यकारी संचालकांनी दिली. भारतात जाणावणारा लसींचा तुटवडा आणि पुरवठा त्यांच्या या निर्णयामुळे यावर तोडगा निघण्यास मदत होणार आहे.

दोन्ही लसींच्या निर्मितीसाठीच्या पायाभूत सुविधा आणि प्लांट वेगळे असणार असून, प्रत्येक लस स्वतंत्र पातळीवर तयार केली जाणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता लसीच्या निर्मितीसंदर्भात हे पाऊल उचलले गेले आहे.

दक्षिण भारतातील हैदराबाद येथील Biological E. ही संस्था आहे. ऑगस्ट महिन्यापासून या संस्थेकडून दरवर्षी 75 ते 80 मिलीयन लसींची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ही लस ह्युस्टनमधील Baylor College of Medicine आणि Dynavax Technologies Corp यांच्या प्रयत्नांतून तयार करण्यात आल्याची माहिती आहे. 1 बिलीयन लसींची निर्मिती 2022 हे वर्ष संपण्यापूर्वी करण्यासाठी बायोलॉजिकल ई. या संस्थेला अमेरिकेकडूनही अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे कळत आहे.

भारतात सध्याच्या घडीला कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा डोस नागरिकांना देण्यात येत आहे. यातच काही दिवसांपूर्वीच रशियाच्या स्पुटनिक या लसीच्या डोसची पहिली खेपही भारतात पोहोचली असल्यामुळे आता ही लसही भारतीयांना देण्यात येणार आहे. जरी असे असले तरीही भारतातील लोकसंख्या पाहता लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांना लसीकरण मोहिमेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच परिस्थितीमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची लस आणि बायोलॉजिकल ई. ची लसही वापरात आल्यास देशातील लसीकरण प्रक्रियेला नक्कीच वेग मिळेल.