सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी करणे टाळा

good
आजकाल सकाळी उठल्याबरोबरच आपल्यापैकी अनेक जण सर्वात आधी मोबाईल फोन हातात उचलून मेसेजेस, चॅटच्या किंवा टीव्हीच्या विश्वात हरवून जातात. सकाळी लवकर उठण्यासाठी लावलेला गजर बंद करून पुन्हा झोपी जाणारेही अनेक जण असतात. सकाळी उठताच सर्वात आधी चहा किंवा कॉफीचा वाफाळता कप समोर असल्याशिवाय काहींना सकाळ झाल्यासारखे वाटतच नाही, तर उठण्यास उशीर झाल्याने भराभर आवरून पटकन हातात येईल ते तोंडात टाकून कामाला बाहेर पळण्याची घाई ही काहींसाठी नित्याचीच झालेली असते. या सवयींमध्ये परिवर्तन आणले, तर आपल्याला आपल्या संपूर्ण दिवसातील कार्यक्रमांची विचारपूर्वक आखणी करता येईल आणि त्यामुळे कामाचा तणाव न जाणवून मन प्रसन्न राहील.
good1
आपण सकाळी उठल्यानंतर आपले शरीर आपोआप कोर्टीसोल तयार करू लागते. हा हार्मोन आपल्या शरीराला आणि मेंदूला सक्रीय ठेवण्यासाठी आवश्यक असतो. हा हार्मोन शरीर स्वतःच तयार करीत असल्यामुळे शरीराची मरगळ घालविण्यासाठी आणि मेंदूला चालना देण्यासाठी चहा किंवा कॉफीची आवश्यकता नसते. सकाळी उठता बरोबर चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याच्या ऐवजी कोमट पाणी प्यावे. त्याने शरीरातील सर्व अवयव, पचनक्रिया सक्रीय होण्यास मदत होते, आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

सकाळचा नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्वाचे भोजन असते. पण आपल्यापैकी अनेक जण कामाच्या घाईमध्ये या महत्वाच्या भोजनाकडे म्हणावे तितके लक्ष देऊ शकत नाहीत. सकाळचा नाश्ता शरीराच्या चयापचय शक्तीला चालना देणारा असून, दिवसभर सक्रीय राहण्यासाठी आवश्यक उर्जा देणारा असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये ताजी फळे, भाज्यांचे रस, आणि प्रथिनांनी परिपूर्ण असा आहार असावा. सकाळी उठण्यासाठी लावलेला गजर बंद करून पुन्हा झोपी जाण्याचा मोह टाळावा, तसेच सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वरील मेसेजेस वाचण्याचा मोहही आवरायला हवा. झोपेतून जागे झाल्यानंतर आपला मेंदू सावकाश सक्रीय होत असतो, त्यामुले डोळे उघडता क्षणी त्याला मिळणारी इतकी सर्व माहिती तो ‘प्रोसेस’ करू शकेलच असे नाही. त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर त्या दिवशी करायच्या कामांची व्यवस्थित आखणी करावी.

Leave a Comment