अशो होती राजीव सातव यांची राजकीय कारकिर्द


मुंबई : कोरोनामुळे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला होता आणि शरीरात या विषाणूचा संसर्ग झाला होता. अखेर आज सकाळी त्यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन झाले आहे.

त्यांनी अत्यंत कमी वयात पंचायत समिती सदस्य, आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास केला. त्यांनी गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून चांगले काम केले. राजीव सातव काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. राजीव सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे.

21 सप्टेंबर 1974 साली राजीव सातव यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील मसोड, तालुका कळमनुरी येथे झाला. त्यांच्या आई, रजनी सातव या शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होत्या. राजीव सातव यांनी आपले शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांचा 2002 साली विवाह झाला आणि सध्या त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

राजीव सातव यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हिंगोली सारख्या एका छोट्याश्या जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य ते थेट खासदार अशी अत्यंत कमी वयात मजल मारली. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक बाणा असलेले राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. उच्च विचारसरणी आणि साधी राहणीमान या धोरणाने काँग्रेस पक्षात त्यांनी आपले मोठे वजन निर्माण केले होते. पक्षातही युवक काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेश अध्यक्ष ते युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली. शिवाय सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निमंत्रित सदस्यही होते.

राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे काँग्रेसचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

अशो होती राजीव सातव यांची राजकीय कारकिर्द

  • 2002 साली ते हिंगोलीच्या कळमनुरी पंचायत समिती सदस्यपदी निवडून गेले.
  • 2007 साली ते हिंगोली जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांची कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी नियुक्ती झाली.
  • 2008 साली ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
  • 2009 साली ते कळमनुरी विधानसभेतुन पहिल्यांदा आमदार झाले.
  • 2010 साली त्यांची अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
  • 2014 साली ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि 16 व्या लोकसभेचे सदस्य झाले.
  • मार्च 2018 साली राजीव सातव अखिल भारतीय काँग्रेसचे ते गुजरात प्रभारी झाले.
  • मार्च 2020 साली त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर नियुक्त झाली.