बुद्धी तल्लख होण्यासाठी आपल्या आहारात करा हे पदार्थ समाविष्ट


ज्याप्रमाणे शरीरातील इतर अवयवांना अन्नातील पोषक घटकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे पोषक घटकांची आवश्यकता आपल्या मेंदूलाही असते. शरीरातील सर्व प्रमुख क्रिया नियंत्रित करणारा असा हा अवयव असल्याने याचे आरोग्यही महात्वाचे आहे. एखाद्या खाद्यपदार्थाची निवड करताना आपण त्याचे रंग, रूप, सुगंध, आणि अर्थातच चव या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेत असतो. आजकालच्या फिटनेसच्या बाबतीत जास्त जागरूक असलेली मंडळी पदार्थाची निवड करताना त्यामध्ये किती कॅलरीज आहेत याचे ही गणित सातत्याने मांडत असतात. मात्र केवळ चव चांगली नाही किंवा कॅलरीज अधिक आहेत म्हणून आवर्जून टाळल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी अनेक पदार्थ मेंदूच्या आरोग्याला पूरक असून, बुद्धीवर्धक आहेत.

स्ट्रॉबेरी, करवंदे, रास्पबेरी या सारख्या फळांमध्ये फायटोकेमिकल्स मुबलक मात्रेमध्ये असतात. ही बुद्धीवर्धक असून, स्मरणशक्ती तल्लख ठेवणारी आहेत. ब्रोकोलीमध्ये असणारे सल्फोराफेन हे तत्व मेंदूची शिथिलता दूर करण्यास सहायक आहे. यामध्ये असलेले फोलिक अॅसिड मेंदू सक्रीय राहण्यास मदत करणारे असून, त्यामुळे अल्झायमर्स सारख्या व्याधींचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक मुबलक मात्रेमध्ये असून, हा क्षार बुद्धीवर्धक आणि स्मरणशक्ती तल्लख करणारा आहे. त्याशिवाय यामध्ये असणारे मॅग्नेशियम, ब जीवनसत्वे, ही देखील मेंदूच्या आरोग्यास पूरक आहेत.

बीटामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या नायट्रेट्स मुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे बीटाचे सेवनही बुद्धीवर्धक मानले गेले आहे. अक्रोडामध्ये जीवनसत्वे, क्षार, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मुबलक मात्रेमध्ये असल्याने याचे सेवन मेंदूच्या आरोग्याला पूरक आहे. अक्रोडाच्या नियमित सेवनाने स्मृतीभ्रंशासारखे विकार टाळता येऊ शकतात. मासे, कडधान्ये, आणि पालेभाज्यांमध्ये क्षार आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणांत असल्याने यांच्या सेवानाने वार्धक्यकाळी उद्भवणारा स्मृतीभ्रंश टाळता येऊ शकतो. आयुर्वेदाच्या अनुसार ब्राह्मी ही औषधी मेंदूसाठी टॉनिकचे काम करते. त्यामुळे केसांना लावण्याच्या तेलामध्ये याचा वापरही बुद्धीवर्धनासाठी केला जाण्याची परंपरा प्राचीन काळापासून रूढ आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment