जाणून घ्या राजीव सातव यांना संसर्ग झालेल्या सायटोमॅजिलो विषाणूबद्दल


पुणे – आज सकाळी महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेसच्या नेतृत्वाला धक्का बसला. रविवारी पहाटे पाच वाजता काँग्रेस श्रेष्ठीच्या वर्तुळातील महत्त्वाचे नेते असलेल्या खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. पुण्यातील जहांगिर रुग्णालयात सातव यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनावर मात करत असतानाच सातव यांना सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता. हा विषाणू नवीन प्रकारचा असून, त्याची लक्षणेही वेगळी आहेत.

सायटोमॅजिलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू असून हा विषाणू अमेरिकेमध्ये ४० वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरीरात आढळून येतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे प्रसरतो.

कोरोनासारखेच या विषाणूचे आहे. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते, ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात. रोग प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर या विषाणूचा शरीरावर प्रभाव जाणवत नाही. पण, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते, त्यांना हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

सायटोमॅजिलोची लागण झाल्यानंतर त्याची प्राथमिक लक्षणेही दिसून येतात. बाधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखी, श्वास घेताना अडचण येते, ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणे आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्गचे निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो.