हे आहे महाभारताशी संबंधित तीन ‘श्रीकृष्ण’


महाभारतामध्ये अनेक रोचक कथा आहेत, प्रसंग आहेत, रहस्येही आहेत. यातील बहुतेक कथा सर्वश्रुत असल्या, तरी या महान रचनेशी संबंधित अनेक कथा आणि रहस्ये आजही लोकांना तितकीशी अवगत नाहीत. त्यापैकी एक आख्यायिका अशी, की महाभारताशी केवळ एकच नाही, तर तीन ‘श्रीकृष्ण’ संबंधित होते. यातील पहिले कृष्ण म्हणजे अर्थातच भगवान श्रीकृष्ण असून, हे महाभारताचे सूत्रधार होते. ते भगवान विष्णूंचे अवतार होते हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच. मग हे आणखी दोन ‘श्रीकृष्ण’ कोण होते, हे जाणून घेऊ या.

महाभारताशी संबंधित दुसरे श्रीकृष्ण होते, महाभारताचे रचयिता महर्षी वेदव्यास. महर्षी वेदव्यासांचे खरे नाव श्रीकृष्ण द्वैपायन होते. एक तर महर्षी वेद्व्यासांचा वर्ण सावळा असल्याने त्यांना ‘कृष्ण’ म्हटले गेले आणि एका द्वीपावर त्यांचा जन्म झाल्याचे म्हटले असल्याने ‘द्वीपावर जन्मेलेला’, म्हणून ‘द्वैपायन’ हे नावही त्यांना दिले गेले. म्हणून महर्षी वेदव्यासांचे नाव श्रीकृष्ण द्वैपायन असल्याचे म्हटले जाते. या नावाशी निगडीत आणखी एका आख्यायिका अशी, की वेद्व्यासांचा जन्म झाल्या झाल्या त्यांनी बालपण न अनुभवता ते लगेच युवावस्थेत आले, आणि तपस्या करण्यासाठी द्वैपायन द्वीपावर निघून गेले. या द्वीपावर सातत्याने अनेक वर्षे तपस्या केल्याने त्यांचा रंग सावळा झाला, म्हणून त्यांचा उल्लेख ‘श्रीकृष्ण द्वैपायन’ असा करण्यात आल्याचे म्हटले आहे.

तिसऱ्या श्रीकृष्णाचा उल्लेख ‘तोतया’ श्रीकृष्ण म्हणून केला गेला आहे. महाभारतकाळी अस्तित्वात असलेल्या पुंड्र देशाच्या राजाचे नाव पौंड्रक होते. काही प्रांतांमध्ये हा राजा ‘पुरुषोत्तम’ या नावानेही प्रसिद्ध होता. पौंड्रकाच्या वडिलांचे नावही वासुदेव असून, पौंड्रक स्वतःचा उल्लेख वासुदेव असा करीत असे. त्याच्या स्वार्थी मित्रांनी देखील त्याची बढाई करीत वास्तविक तोच विष्णूचा अवतार असल्याचे त्याच्या मनामध्ये भरवून दिले होते. त्यामुळे पौंड्रक देखील स्वतःला विष्णूचा अवतार समजू लागला होता. त्याने श्रीकृष्णाप्रमाणेच आपले रंग रूप करवून घेतले असून, हातांमध्ये खोटे चक्र, शंख, डोक्यावर मोर मुकुट, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी, आणि पीतवस्त्रे धारण करीत असे. आपणच भगवान विष्णूंचे अवतार आहे हा ग्रह त्याच्या मनामध्ये इतका पक्का होता, की त्या अहंकारापायी त्याने खुद्द भगवान श्रीकृष्णालाच युद्धासाठी ललकारले असता, श्रीकृष्णाने अखेर पौंड्रकाचा वध केला.

Leave a Comment