काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन


पुणे : कोरोनामुळे काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. यासंदर्भात माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर सातव यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, त्यानंतर मात्र त्यांना न्युमोनियाची पुन्हा लागण झाली होती.

राजीव सातव यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदा नेता अशी ओळख होती. राजीव सातव यांची गेल्या 23 दिवसांपासून कोरोनाशी झुंज सुरु होती. राज्यभरातून सातव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती. आज सकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राजीव सातव यांच्या निधनाची दुःखद बातमी अधिकृतपणे ट्वीट करुन दिली.

राजीव सातव यांना काँग्रेसचे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात होते. राजीव सातव यांचा जर प्रवास पाहिला तर सामान्य कार्यकर्त्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी त्यानंतर पक्षाने दिलेले महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षपद, दोन वेळा खासदारकी आणि काँग्रेस पक्षाची सर्वोच्च वर्किंग कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तींयांपैकी ते एक होते. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतही काही दिवसांपूर्वी त्यांचे नाव आघाडीवर होते. काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये तसेच गेल्या काही वर्षांच्या काँग्रेसच्या प्रवासात राजीव सातव यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.

राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी पद होते. तसेच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या. राजीव सातव यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवला होता.

त्यांची राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. पुढे 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान सातव यांच्यावर गुजरात प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसने चांगले यश मिळवले होते.