पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर पडले आहेत धूळ खात; पंतप्रधानांनी दिले तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र आणि राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. पीएम केअर फंडच्या माध्यमातून मिळालेले व्हेंटिलेटर अनेक राज्यात धूळ खात पडत असल्याच्या बातम्यांची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेतली. त्याचबरोबर त्यांनी केंद्राने पुरवलेल्या व्हेंटिलेटरचा वापर, सद्यस्थिती याबाबत तातडीने ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

आकडेवारीचे भय न ठेवता राज्यांनी जास्तीत जास्त टेस्ट प्रामाणिकपणे कराव्यात असा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या भागात टेस्टिंग अजून वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हाय पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या भागात टेस्टींग वाढवल्या पाहिजेत. गाव-खेड्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. खेड्यांमध्ये डोअर टू डोर टेस्टिंग आणि सर्व्हिलान्सची व्यवस्था करावी, असेही आदेश दिले.

सुमारे 50 लाख चाचण्या मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात घेण्यात येत होत्या. ही संख्या एप्रिलमध्ये वाढून 1.3 कोटी चाचण्या केल्या जात होत्या, असे बैठकीत सांगण्यात आले. देशभरात ऑक्सिजना तुटवडा जाणवत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ग्रामीण भागात ऑक्सिजनचा योग्य पुरवठा करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर व इतर उपकरणे चालवण्यास प्रशिक्षित केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी ग्रामीण भागातही ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी यंत्रणा सक्षम करण्याबाबत आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचे आहे. यासाठी गरजेच्या उपकरणांची व्यवस्था महत्त्वाचे आहे. तसेच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना सशक्त बनवण्यावर जोर दिला पाहिजे. तसेच ग्रामीण भागात ऑक्सिजन सप्लाय निश्चित करण्यासाटी डिस्ट्रिब्युशन पॉलिसी तयार केली पाहिजे. यात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्सचाही समावेश होणार, असा पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.