ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी


नवी दिल्ली – भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यामुळे त्याच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. दिल्ली पोलीस सुशील कुमारचा दिल्लीमध्ये झालेल्या एका खुनाच्या घटनेमध्ये शोध घेत आहेत. पण, सुशील कुमार ही घटना उघड झाल्यापासून पोलिसांना सापडला नसल्यामुळे त्याच्याविरोधात आधी पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यामुळे सुशील कुमार सापडताच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. ४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या आवारात सागर राणा या २३ वर्षीय कुस्तीपटूची हत्या झाली होती. त्या प्रकरणात सुशील कुमार याच्यासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सुशील कुमारने यासंदर्भात पोलिसांशी बोलताना छत्रसाल स्टेडियममध्ये आलेले ते आमचे कुस्तीपटू नव्हते. आम्ही त्यासंदर्भात पोलिसांना देखील माहिती दिली आहे. काही अज्ञात लोकांनी आमच्या स्टेडिममध्ये अवैधरीत्या प्रवेश केला आणि आमच्याशी वाद घातला. या घटनेशी आमचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, तेव्हापासून सुशील कुमार गायब आहे.

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर ४ मे रोजी सुशील कुमार आणि त्याच्या काही सहकाऱ्यांचा सागर राणा याच्यासोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दोन जण जखमी देखील झाले. त्यामध्ये सागरला जास्त मार लागल्यामुळे त्याला रुग्णालायात दाखल करण्यात आले. पण, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा वाद मॉडेल टाऊन परिसरातल्या एका फ्लॅटवरून झाल्याचे सांगितले जात आहे. पण, सुशील कुमारने वेगळी भूमिका मांडली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फूटेजच्या मदतीने अधिक तपास सुरू केला आहे.