काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक, आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती


जालना : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक असून सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस त्यांच्या शरीरात आढळला आहे. या विषाणूचा त्यांच्या शरीराला संसर्ग झाला असून या सर्व कारणाने त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. पण, तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या उपचारासाठी तैनात असून आपण उद्या जहांगीर रुग्णालयाला भेट देणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. राजीव सातव काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले होते. परंतु, सातव यांना सायटोमॅगीलो Cytomegalovirus (CMV) या नवीन विषाणूचा संसर्ग झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुण्यातील जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जहांगीर रुग्णालयात जाणार आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्याचबरोबर ते आता व्हेंटिलेटर शिवाय देखील श्वास घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना काही दिवसात डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉक्टरांनी म्हटले होते.

मात्र, सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारते आहे असे वाटत असतानाच ती पुन्हा खालावली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देखील राजीव सातव यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेत आहेत.