केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; आधारकार्ड नसेल तरी घेता येणार सरकारी योजनांचा लाभ


नवी दिल्ली – संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य यंत्रणेची स्थिती गेल्या काही दिवसांत पाहता अनेकांनी धास्ती घेतली आहे. कोरोनारुपी संकट दूर करण्यासाठी असलेली आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून गेल्याचे दिसून आले. अनेक रुग्णालयात तर अपुऱ्या वैद्यकीय यंत्रणा आणि ऑक्सिजन अभावी रुग्णांना जीव गमवावा लागला.

सध्या कोरोनाबाधितांची संख्या घटत असली तरी कोरोना साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. पण उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे अनेक कुटुंबांचे हाल होत आहेत. आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटात देण्यात येणाऱ्या लाभासाठी आधारकार्ड अनिवार्य नसणार आहे.

जर आधारकार्ड तुमच्याकडे नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. आपल्याला कोणत्याही लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून सांगण्यात आल्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा लोकांनाही सेवा आणि सरकारी योजनांचा फायदा घेता येणार आहे.

आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक नसल्याचे कारण पुढे अनेक रेशन कार्ड रद्द करण्यात आली होती. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. सरकारच्या निर्णयामुळे गरीबांना उपासमारीच्या संकटाला सामोरे जाव लागत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सर्व राज्यांकडून चार आठवड्यात उत्तर मागितले होते.

साडेतीन लाखांच्या जवळपास देशात दररोज कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तर मृत्यू संख्येचा आलेख मात्र चार हजारांच्या मागे पुढेच सरकताना दिसत असून, देशातील कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचे वादळ अद्याप कायम आहे. काल दिवसभरात मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तितकीच एक बाब देशासाठी दिलासा देणारी ठरली आहे.