कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; एका मंत्र्यावर एका जिल्ह्याची जबाबदारी


चेन्नई : तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केला आहे. तामिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी एका मंत्र्याला देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी हे मंत्री राहतील. त्यांच्यासोबत एक वरिष्ठ सनदी अधिकारी असेल. या दोघांच्या शिवाय त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा मिळून कोरोनाचे व्यवस्थापन करतील. महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक मृत्यू झालेल्या राज्यात मात्र आजही पालकमंत्री सक्रीय नसल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.

रविवारी आपल्या मंत्र्यांना १० मेपासून सुरू झालेल्या दोन आठवड्यांच्या लॉकडाऊनची संपूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी सांगितले. कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अपव्यय कसा टाळता येईल, याची काळजी घेण्यास सांगितले. कोरोनाची अधिक बाधा आणि रूग्ण संख्या असलेल्या 14 जिल्ह्यांमधील कोविड-नियंत्रण उपायांचे पर्यवेक्षण, आढावा घेण्यास आणि समन्वय करण्यासाठी 22 मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केली आहे.

हा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच घेण्यात आला. बैठकीत स्टॅलीन यांनी आपल्या सहकार्यांना सांगितले की त्यांनी रेमडेसिवीरच्या विक्रीवर नजर ठेवावी. कोणतेही औषध, अँटी-व्हायरल औषध काळ्या बाजारात विकली जात नाही ना हे पाहण्याच्या जबाबदारी मंत्र्यावर आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी एक पत्र पाठवले आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व घटकांना कोणताही पक्षपात किंवा भेदभाव न करण्याचे वचन दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, उत्कृष्ठ राज्यात तमिळनाडूचे रूपांतर करण्याची आणि पुढची पिढी पुढे जावी अशी आपली इच्छा आहे. हे माझे नेतृत्व करणारे सरकार असले तरी हे द्रमुक पक्षाचे सरकार नाही. हे सरकार सर्व लोकांचे आहे.

दोन मंत्र्यावर काही जिल्ह्याची जबाबदारी असेल. तर काही जिल्ह्यांना एक मंत्री नियुक्त करण्यात आला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यांकडे मंत्री विशेष लक्ष देतील. कोरोना उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांचे समन्वय करतील. लॉकडाऊनच्या नियमांचे योग्य पालन केले जाईल याची खात्री करुन घेतील.

आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम या मंत्र्याचे नियोजन करतील. हिंदु धार्मिक व धर्मादाय वंशाच्या विभागाचे मंत्री पीके सेकर बाबू हे चेन्नईचे प्रभारी असतील. ग्रामीण उद्योगमंत्री आयएम अंबरासन चेंगलपेट तर वनमंत्री के रामचंद्रन आणि नागरी पुरवठा मंत्री आर चक्रपाणी कोयंबटूरचे निरीक्षण करतील. तुतीकोरिन हे समाज कल्याण मंत्री गीता जीवन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अनिता राधाकृष्णन यांच्याकडे असतील तर ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी हे सालेमचे प्रभारी आहेत.