एम्सच्या संचालकांनी दिली म्युकरमायकोसिसबद्दल महत्त्वपूर्ण माहिती


नवी दिल्ली – संपूर्ण देश एकीकडे कोरोना प्रादुर्भावाविरोधात लढा देत असतानाच दुसरीकडे म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या आजाराच्या रूपात नवे संकट देशासमोर उभे राहिले आहे. कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसच्या रुग्णात झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

म्युकरमायकोसिसबाबत माहिती देताना डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, म्युकरमायकोसिस हा चेहरा, संक्रमित नाक, डोळे आणि मेंदूला बाधित करू शकतो. त्यामुळे दृष्टी जाण्याचीही भीती असते. त्याबरोबरच म्युकरमायकोसिसचा संसर्ग हा फुप्फुसांपर्यंतही पोहोचू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

म्युकरमायकोसिसच्या संसर्गाचे उपचारांमध्ये स्टेरॉईडचा वापर हे मुख्य कारण आहे. ज्याप्रकारे कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत, ते पाहता रुग्णालयांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर होत असलेले फंगल आणि बॅक्टेरियल संसर्ग मृत्यूचे कारण ठरत आहेत.

एम्सच्या संचालकांनी पुढे सांगितले की, माती, हवा आणि भोजनामध्येही म्युकरमायकोसिस बीजाणू दिसून येतात. पण ते कमी विषाणूजन्य असतात आणि संसर्गाचे कारण ठरत नाहीत. कोरोनाच्या संसर्गास सुरुवात होण्यापूर्वी अशाप्रकारच्या संसर्गाचे कमी रुग्ण सापडत असत. पण आता म्युकरमायकोसिसचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.

एम्समध्ये सध्या अशाप्रकारच्या बुरशीजन्य संसर्गाच्या २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील २० जण अद्यापही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर ३ जण कोरोना निगेटिव्ह आहेत. अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे ५०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत.

गुलेरिया यांनी सांगितले की, या संसर्गाचे स्टेरॉईडचा चुकीचा वापर हे प्रमुख कारण आहे. डायबिटिस, कोरोना पॉझिटिव्ह आणि स्टेरॉईड घेणाऱ्या रुग्णांमध्ये या बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अधिक असते. त्याला रोखण्यासाठी आपण स्टेरॉईडचा दुरुपयोग थांबवला पाहिजे.