कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन विधानभवन, राजभवनाचे बांधकाम छत्तीसगड सरकारने थांबवले


झांसी – कोरोना महामारीचा सामना एकीकडे संपुर्ण देश करत आहे. तर या लढाईत देशातील सर्व राज्यांची यंत्रणा सक्रीय आहे, पण दुसरीकडे सरकारी बांधकामांना देखील वेग आला आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे काम दिल्लीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोदी सरकार देश संकटात असतांना १२०० ते १३०० कोटी रुपयांचा खर्च करुन नवीन बांधकामासाठी करत आहे. विरोधक यावरून मोदी सरकारवर टीका करत आहेत. या प्रकल्पाला कॉंग्रेसने देखील विरोध केला आहे.

कॉंग्रेसचे हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी लिहिलेल्या पत्रात कॉंग्रेसवर दुटप्पीपणाचा आरोप केला होता. एकीकडे सेंट्रल व्हिस्टाचे काम सुरू ठेवण्यावरून मोदी सरकारवर कॉंग्रेस टीका करीत आहे. पण, छत्तीसगड सरकार नवीन विधानसभा, राजभवन बांधत असल्याचे नड्डा म्हणाले होते.

दरम्यान, नवीन विधानसभा इमारत, राजभवन, मुख्यमंत्री निवास तसेच राज्यातील अन्य मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामांवर छत्तीसगड सरकारने बंदी घातल्याची माहिती मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्वीट करून दिली.

भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटमध्ये आमचे नागरिक, आमचे प्राधान्य. कोरोना काळापूर्वी राज्यात नवीन विधानसभा इमारत, राजभवन, मुख्यमंत्री निवासस्थान, मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान, नवीन सर्किट हाऊस आदी बांधकामांचे पायाभरणी करण्यात आली. आज संकटाच्या वेळी या सर्व बांधकामांवर बंदी घातली आहे.