कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी बजाज ऑटोने घेतला मोठा निर्णय


नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू लागलेला असतानाच या काळात अनेक उद्योगपतींनी देखील मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यामध्ये आता बजाज ऑटोचाही समावेश झाला आहे. बजाज ऑटोने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या आर्थिक मदतीच्या आणि इतर सुविधांबाबतच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी कंपनीकडून राखीव कोरोना बेडसारख्या निर्णयासोबतच कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचा देखील समावेश आहे. यासंदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिले आहे. बजाजने आत्तापर्यंत वेगवेगळ्या सरकारी किंवा स्थानिक प्रशासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रकल्पांना आर्थिक मदत देखील देऊ केली आहे.

नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीमध्ये कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दोन वर्षांपर्यंत त्याचा पगार पुरवला जाईल. त्यासोबतच, त्याच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीकडून उचलली जाईल. तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी ५ वर्षांपर्यंत आरोग्य विम्याची देखील सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोना संकटकाळात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा हातभार लागणार आहे.

बजाजने कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आकुर्डीच्या प्लांटमध्ये ३२ बेड, वळुंजच्या प्लांटमध्ये २०० बेड, चाकणच्या प्लांटमध्ये १६ बेड तर पंतनगरच्या प्लांटमध्ये १५ बेडची सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. यातील काही बेड हे कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. इतर बेड स्थानिक पातळीवर रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बजाजने जून २०२०पासून आपल्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या एकूण ४ हजार ४०० चाचण्या केल्या आहेत.