उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका


मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये तर आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मोठ्या संख्येने मृतदेहांवर अंत्यसंस्कार गंगा नदीच्या किनारी करण्यात येत आहेत. गंगा नदीच्या किनाऱ्यावर मृतदेह वाळूमध्ये पुरून अंत्यसंस्कार केले जात असल्यामुळे मृतदेहांची विटंबना होण्याचे प्रकार घडत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले, कोविडमुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचे मार्गदर्शक तत्त्व उत्तर प्रदेशात अक्षरशः गंगेला मिळाल्याचे दिसतंय. यामुळे आपण कोरोना रोखतोय की पसरवतोय असा प्रश्न पडतो. शिवाय मृतदेहांची होणारी विटंबना वेगळीच! काय बोलावं? जिवंतपणी उपचार नाही अन मृत्यूनंतरही अवहेलनाचं!, हे धक्कादायक आहे.

यापुर्वी, बिहारच्या बक्सरमध्ये चौथा शहरातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर सुमारे १०० मृतदेह आढळले होते. त्यानंतर हे मृतदेह उत्तर प्रदेश मधून वाहून आल्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली होती. या घटनेवरून बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान बिहारच्या बक्सरनंतर उत्तर प्रदेशातील गाझीपुरातील गंगेच्या काठी मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.