सरकारबद्दल चांगले लिहावे यासाठी शिवसेना भवनातून सेलिब्रिटींना जातात पैसे ; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप


मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्यावरुन संताप व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी शिवसेना भवनातून अनेक सेलिब्रिटींना फोन जात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांचा उल्लेख करत त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचाही आरोप टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत नितेश राणे यांनी केला आहे.

एकीकडे रिक्षावाल्यांचे १५०० रुपये या सरकारने अजून दिलेले नाहीत. गहू, तांदूळ देणार होते त्याचा एक दानाही मिळालेला नाही. साडेपाच हजारांचे पॅकेज जाहीर केले होते त्याचे काहीही झालेले नाही, एक रुपयाही मिळालेला नाही. आणि दुसरीकडे सहा कोटी खर्च होत आहेत. हे पैसे फक्त उपमुख्यमंत्री खर्च करत नाही आहेत. यासाठी अनेक खासगी एजन्सींना महाराष्ट्र सरकारने नेमले आहे.

ही रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे, ज्यामार्फत दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहे. काही लोकांना तर शिवसेना भवनमधून फोन केले जात आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. छोटे कलाकार असतील तर दोन-तीन लाख आणि मोठे असतील तर १०-१५ लाख एवढे पैसे दिले जात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

तुम्ही करीना कपूर किंवा कतरिना कैफ तसेच इतर कलाकारांची अलिकडील ट्विटस बघा. सगळ्याचे ट्विट एकसारखे आणि महाराष्ट्र सरकारचे गोडवे गाणारे दिसतील. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहेत, पैशाचा आकडा एवढा मोठा आहे की त्याचा विचारही केला जाऊ शकत नसल्याचे ते म्हणाले आहेत.

एकीकडे लोकांना देण्यासाठी, ऑक्सिजनसाठी पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे भीक मागत असतात. दुसऱ्या बाजूला स्वत:ला मेकअप लावण्यासाठी सगळ्या कलाकारांना कामाला लावतात. फोन करुन त्यांच्यावर दबाव आणले जातात. एका बाजूला गरिबी दाखवून दुसऱ्या बाजूला स्वत:वर खर्च करता हा खोटारडेपणा नाही का?, अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. या सरकारला आगामी अधिवेशनात उघडे पाडणार असून हा विषय मांडणार आहे. कोणा कोणाला शिवसेना भवनातून फोन गेले याची यादी माझ्याकडे आहे. ही धूळफेक आणि भंपकपणा असल्याचेही ते म्हणाले.