27 जूनला होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आता 10 ऑक्‍टोबरला


नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा 27 जून रोजी होणार होती. पण ही परीक्षा आता 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. देशभरातील वेगवेगळ्या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडत आहेत. त्यामध्ये आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचीही भर पडली आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 27 जून रोजी घेतली जाणार होती. UPSCच्या नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षेला आधीच उशीर झाला होता. आता पुन्हा एकदा कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. तसेच युपीएससीने 10 ऑक्टोबर ही नवी तारीख जाहीर केली आहे.

देशात यापूर्वीही कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु, युपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्यासोबत नव्या तारखा जाहीर केल्यामुळे विद्यार्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे. यूपीएससी परीक्षा 2021 आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2021 साठी 24 मार्चपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.