पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला विरोध वाढला!


नवी दिल्ली – दिवसेंदिवस देशात कोरोनाचा कहर उग्र रूप धारण करत आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून दररोज ३ लाखांहून जास्त रुग्ण आढळत असल्यामुळे देशातील परिस्थिती चिघळू लागली असताना राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेला सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे.

देशातील एकूण १२ विरोधी पक्षांच्या प्रमुखांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हा प्रकल्प तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ आता देशातील इतर नेते देखील याच सुरात सूर मिसळून प्रकल्प तातडीने बंद करून, तो निधी कोरोनासाठी वापरला जावा, अशी मागणी करू लागले आहेत. या प्रकल्पावरून टीका करताना पंतप्रधानांची तुलना थेट हुकुमशाहांशी केरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनी केली आहे.

आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून थॉमस आयझॅक यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सेंट्रल व्हिस्टासाठीची पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतीव इच्छा ही अनेक राज्यकर्त्यांना किंवा हुकुमशाहांना मोठमोठ्या वास्तूंवर आपले नाव पुढच्या पिढ्यांसाठी कोरून ठेवण्यासाठी असलेल्या इच्छेसारखीच वाटत आहे. जागे व्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी. व्हिस्टाचा पैसा लसीकरणासाठी वापरा!, असे या ट्वीटमध्ये आयझॅक यांनी म्हटले आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन अशा देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्तपणे थेट पत्र लिहिले आहे.

या पत्रामध्ये राजधानी दिल्लीमध्ये बांधला जाणारा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, देशभरातील नागरिकांसाठीचे मोफत लसीकरण, केंद्र सरकारने पारित केलेले ३ कृषी कायदे अशा एकूण ९ मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तातडीने थांबवण्यात यावा आणि त्यासाठी देण्यात आलेला निधी ऑक्सिजन आणि लसींचा साठा मिळवण्यासाठी वापरावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.