दिलासादायक ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस


नवी दिल्ली – एकीकडे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. या प्रश्नाला आता पूर्णविराम लागला असून पुढील आठवड्यापासून स्पुटनिक व्ही लस मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप दाखल झाली असून दुसरी खेप उद्या भारतात दाखल होणार आहे.

भारतात स्पुटनिक व्ही लस आली आहे. त्याचबरोबर मला सांगण्यात आनंद वाटत आहे की, ही लस भारतात पुढच्या आठवड्यापासून मिळण्यास सुरुवात होईल. रशियातून आलेल्या लसीची लवकरच विक्री सुरु होईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितले आहे.

१ मे रोजी भारतात स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप आली होती. आता लशीची दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. भारतात रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लसीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

जुलै महिन्यात या लसीचे उत्पादन सुरु होईल, असेही वीके पॉल यांनी सांगितले. या लसीचे १५.६ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. तर भारतीयांसाठी ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान २१६ कोटी डोस तयार केले जातील. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी मागितली होती. मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी ही लस तयार केली असून लसीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.