2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी


नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर क्लिनिकल चाचणी घेण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी तज्ज्ञ समितीने शिफारस केली होती. आता त्याला डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. ही चाचणी 525 स्वयंसेवकांवर होणार आहे.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारत सामना करत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरणही सुरु आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्यात लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवला आहे. आता त्यात 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी करण्यास परवानगी देऊन सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

525 जणांवर ही क्लिनिकल ट्रायल होणार आहे. दिल्लीतील एम्स, पाटण्यातील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. कोरोना लसीशी संबंधित समितीच्या शिफारशींनुसार, भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्याआधी दुसऱ्या टप्प्याचा डेटा उपलब्ध करावा लागेल.

ज्या शिफारशीला डीसीजीआयने मंजुरी दिली, त्यानुसार 525 स्वयंसेवक चाचणीत असतील. त्यांचे वय 2 ते 18 वर्षांच्या दरम्यान असेल. इंजेक्शनद्वारे लसीचे डोस दिले जातील. पहिला डोसनंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येईल. कोव्हॅक्सिनच्या सामान्य चाचणीमध्येही दोन डोसदरम्यान 28 दिवसांचे अंतर होते. सध्या केवळ 18 वर्षांवरील नागरिकांसाठी भारतातील दोन लसी वापरल्या जात आहेत. देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे.

भारत बायोटेकने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतर गोष्टींचं आकलन करण्यासाठी कोव्हॅक्सिन डोसच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. मंगळवारी (11 मे) भारत बायोटेकच्या विनंतीवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच सीडीएससीओच्या कोविड-19 विषयक तज्ज्ञ समितीने विचारविनिमय केला. त्यानंतर समितीने प्रस्तावित दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर औषध महानियंत्रकांनी काल (12 मे) कोव्हॅक्सिनच्या चाचणीसाठी परवानगी दिली.