टेस्लाच्या कार खरेदीसाठी आता करता येणार नाही बीटकॉइनचा वापर


नवी दिल्ली : आता टेस्लाच्या कार खरेदीसाठी बीटकॉइनचा वापर करता येणार नाही. आपल्या कार खरेदीसाठी टेस्लाने बीटकॉइनचा पर्याय दिला होता. पण कंपनीने आपला हा निर्णय मागे घेतला असून सीईओ इलॉन मस्क यांनी तशा प्रकारची घोषणा केली आहे. अनेक स्तरावर वापर करण्याजोगी क्रिप्टोकरन्सी ही चांगली कल्पना आहे, पण त्याचा पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत मोजून वापर आपण करत नसल्याचे इलॉन मस्क यांनी सांगितले आहे.

आता आपण बीटकॉइनचा वापर करणार नसल्याचे इलॉन मस्क यांनी स्पष्ट करताना सांगितले की, आता बीटकॉइनच्या माध्यमातून टेस्लाची कार खरेदी करता येणार नाही. बीटकॉइनचा वापर हा पारंपरिक इंधनांच्या व्यवहारांसाठी विशेषत: कोळशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. कोळसा हा कार्बन उत्सर्जनाचे सर्वात मोठे आणि वाईट माध्यम आहे.

आपल्या ट्वीटच्या माध्यमातून इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे. भविष्यातील क्रिप्टोकरन्सीचे ते एक आघाडीचे माध्यम असेल. पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची मोठी किंमत मोजून आपण त्याचा वापर करू शकत नाही. बीटकॉइन न स्वीकारण्याच्या इलॉन मस्क यांच्या या निर्णयानंतर बीटकॉइनच्या किंमती 17 टक्क्यांनी घसरल्याचे वृत्त आहे.

आता कोणत्याही बीटकॉईनची विक्री टेस्लाकडून होणार नसल्याचे इलॉन मस्क यांनी सांगितले असून आता आपण इतर क्रिप्टोकरन्सीच्या पर्यायांची चाचपणी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इलॉन मस्क गेले काही दिवस डॉजकॉईन या क्रिप्टोकरन्सीचा पुरस्कार करताना दिसत आहेत. टेस्लाची कार या आधी बीटकॉइनच्या माध्यमातून खरेदी करता येऊ शकते, अशी घोषणा करत कंपनीने आपल्या वेबसाईटवर पेमेंट ऑप्शनमध्ये डॉलरसह बीटकॉइनचा पर्यायही दिला होता.

जागतिक अर्थव्यवसस्थेत कोरोनाच्या काळात मंदी असताना बीटकॉइनची किंमत मात्र सातत्याने वाढत राहिली. जगातील अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी या काळात त्यामध्ये गुंतवणूक केली. टेस्लाच्या इलॉन मस्कनेही यामध्ये 1.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर बीटकॉइनच्या किंमतीत वेगाने वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच बीएनवाय मेलन, मास्टरकार्ड या कंपन्यांनीही बीटकॉइनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.न