बद्रीनाथ होणार स्मार्ट अध्यात्मिक शहर, तेल कंपन्या देणार १०० कोटी

चारधाम यात्रेतील हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान बद्रीनाथ धाम स्मार्ट अध्यात्मिक शहर म्हणून विकसित केले जाणार असून त्यासाठी देशातील सरकारी तेल कंपन्या १०० कोटी रुपये देणार आहेत. या स्थानाच्या विकासामुळे भाविकांच्या सुविधा वाढणार आहेतच पण येथे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे. या संदर्भात उत्तराखंड मुख्यमंत्री तीरथ रावत, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत केदारनाथ उत्थान ट्रस्ट व तेल आणि नैसार्गिक वायू मंत्रालय आणि तेल कंपन्या यांच्यात गुरुवारी एमओयु करण्यात आला. व्हर्चुअल स्वरुपात ही प्रक्रिया पार पडली असे समजते.

बद्रीनाथ धामचे या योजनेअंतर्गत धार्मिक स्मार्ट पहाडी शहर म्हणून विकसन केले जाणार आहे. अर्थात पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचू नये याची पूर्ण काळजी घेऊन हा विकास केला जाणार आहे. विकासाच्या पहिल्या टप्प्यात हॉस्पिटल विस्तार, रिव्हर फ्रंट विकास, लँड स्केपिंग, गर्दी झाल्यास होल्डिंग एरिया, पुलांचे फिटिंग अशी कामे होणार आहेत.

इंडीयन ऑइल कंपनी, ओएनजीसी, गेल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या विकसन कामासाठी १०० कोटी रुपये देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बद्रीधाम तीर्थाची अध्यात्मिक परंपरा कायम रहावी यासाठी एक योजना आखली होती. २०१३ मध्ये केदारनाथ येथे आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे उध्वस्त झालेल्या भागाच्या पुनर्निमाणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच धर्तीवर बद्रीनाथ धामचा कायाकल्प केला जाणार आहे. नवीन काम करताना पुढील १०० वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन त्यादृष्टीने विकास केला जाणार आहे असे समजते.