ICMR च्या प्रमुखांचा देशातील बहुतांश राज्यात सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला


नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावचा दर देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्याहून जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचे मत इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे. भारतातील 718 जिल्ह्यांपैकी दोन तृतीयांश जिल्ह्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीत कोरोना प्रादुर्भावाचा दर हा 10 टक्क्यांहून जास्त असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मंगळवारी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, देशातील कोरोनाच्या नवीन म्युटेंटमुळे तरुणांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर तरुण लोक हे प्रवास करत असल्यामुळेही त्यांना जास्त प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जास्त काही अंतर नाही. या दुसऱ्या लाटेतही 40 वर्षावरील लोकांनाही आरोग्याच्या समस्यांमुळे कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. या लोकसंख्येलाच सध्या कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे.

कोरोनाची तिसरी लाट देशात येऊ शकते आणि त्याचा फटका लहान मुलांना बसू शकतो, अशा प्रकारची मते अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. डॉ. बलराम भार्गव या वयोगटातील बालकांच्या कोरोना लसीकरणाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे संक्रमण झालेल्या वयोगटात जास्त अंतर नसल्यामुळे तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त धोकादायक असल्याचे मत आताच व्यक्त करणे घाईचे ठरेल.

डॉ.बलराम भार्गव यांनी गेल्या माहिन्यात कोविड टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत देशात लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंतर जनतेला संबोधित करताना सांगितले होते की, राज्यांनी मायक्रो कन्टेन्मेन्ट झोनवर लक्ष केंद्रीत करावे आणि लॉकडाऊनचा पर्याय हा शेवटचा असावा.