मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील लॉकडाऊन २५ मे पर्यंत वाढवला


पटना – महाराष्ट्रानंतर आता बिहारमधील लॉकडाऊन देखील वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची वाढती भीषणता पाहता बिहार सरकारने राज्यातील लॉकडाऊन २५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्वीट करून दिली आहे. बिहारमध्ये पुढील दहा दिवस लॉकडाऊनचे निर्बंध लागू असतील, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बिहारमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनची आज सहयोगी मंत्रिमंडळ आणि पदाधिकाऱ्यांसोबत समीक्षा केली. त्यात लॉकडाऊनमुळे सकारात्मक प्रभाव आल्याचे समोर आल्यामुळे बिहारमध्ये पुढचे १० दिवस म्हणजेच १६ मे ते २५ पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ट्वीट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे.

बिहारमध्ये गेल्या तीन आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून आली आहे. एका दिवसात कोरोनाबाधितांची संख्या १० हजाराच्या खाली आली आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे सांगण्यात आले आहे. बिहार सरकारने लॉकडाऊनचा प्रभाव आणि पुढील नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला होता. त्यात अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन वाढण्यावर भर दिला होता.