पाणीपुरवठा विभाग राबविणार अभय योजना


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी पाणीपट्टीवरील विलंब आकार, कर्जावरील दंडनीय व्याज तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांकरीता व्याज माफीच्या सवलतीची अभय योजना राबविण्यास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या 148 व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या नागरी, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, डोंगराळ/ पर्यटन क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना व पेरी अर्बन योजनांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दराचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसेच सुधारित दरांना मंजुरी देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे एक मंडळ कार्यालय स्थापन करण्यास तसेच धुळे व उदगीर येथे विभागीय कार्यालय निर्माण करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामासाठी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी) यांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शिरभावी व 81 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दैनंदिन देखभाल व दुरुस्तीकरिता जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. खामगाव पाणीपुरवठा योजना काही अटींच्या अधीन राहून खामगाव नगरपरिषदेला हस्तांतरित करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.