आठवड्याभरापासून देशातील इंधन दरवाढ कायम, परभणीत पेट्रोल शंभरी तर डिझेल नव्वदीपार


नवी दिल्ली – देशभरात मागील आठवड्याभरापासून सुरु असलेली इंधन दरवाढ अद्यापही सुरु असून मागील आठ दिवसांत पेट्रोल 1 रुपया 40 पैसे, तर डिझेल 1 रुपये 63 पैश्याने महागले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील परभणीत पेट्रोलने शंभरी पार केली आहे, तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत.

5 राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि देशभरात इंधन दरवाढ सुरु झाली. मागील 8 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ आजही कायम असून आज पेट्रोलमध्ये 24 पैसे, डिझेलमध्ये 26 पैशांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे लागेलले लॉकडाऊन आणि त्यात ही इंधन दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य परभणीकरांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत वाढ होत आहे. सततच्या वाढीमुळे सामान्यांचे लॉकडाऊनमधील बजेट मात्र कोलमडले आहे. नांदेड जिल्ह्यात आज पेट्रोलचे दर 100 रुपये 54 पैसे तर डिझेल दर 90 रुपये 49 पैसे झाले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. पेट्रोलचे दर काल 100 रुपये 4 पैसे होते, तर डिझेल 89 रुपये 92 पैसे होते. तर आज पेट्रोल मध्ये 51 पैसे तर डिझेलमध्ये 57 पैशांची वाढ झाली आहे.

https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx या इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर पेट्रोल डिझेलचे दर तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच तुमच्या मोबाईलवर इंडियन ऑईलचे IndianOil ONE Mobile App डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.