जातीवाचक शब्द वापरल्यामुळे गोत्यात आली तारक मेहताची… बबिता


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. तिने एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण तिच्या व्हिडीओमुळे वादंग निर्माण झाले असून तिचे चाहते तिच्यावर फार संतापले आहेत. त्याचबरोबर मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. तसेच #ArrestMunmunDutta हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

एका जातीवाचक शब्दाचा मुनमुनने या व्हिडीओत वापर केला होता. मी युट्यूबवर लवकरच पदार्पण करणार आहे आणि मला चांगले दिसायचे आहे. मला कुण्या ***** सारखे दिसायचे नसल्याचे मुनमुन या व्हिडीओत म्हणताना दिसली़. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी राग व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.


अभिनेत्री मुनमून दत्ता यांनी जातीवाचक शब्दांचा वापर करत एक व्हिडीओ ट्विट केल्यामुळे देशातील तमाम दलित समाजाचा अपमान केला आहे. दत्ता यांचे असे बोलणे आंबेडकरवादी जनता सहन करणार नसल्यामुळे त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.