दया नायक यांच्या बदलीच्या आदेशाला मॅटने दिली स्थगिती


मुंबई – मुंबई एटीएसमधून थेट गोंदियामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी दया नायक यांची बदली करण्यात आली होती. मॅटने दया नायक यांच्या राज्य पोलीस महासंचालकांच्या ६ मे रोजीच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिल्यामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान दया नायक यांच्यासह सहा पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती.

गुरुवारी ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार कोथमिरे व दहशतवादविरोधी पथकातील निरीक्षक दया नायक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. कोथमिरे यांची गडचिरोलीला, तर नायक यांची गोदियाला उचलबांगडी करण्यात आली होती. ६ मे रोजी त्याबाबतचे आदेश पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले असून त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याची सूचना घटकप्रमुखांना करण्यात आल्या होत्या.

राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची धुरा संजय पांडे यांनी सांभाळल्यापासून वादग्रस्त ठरलेले अधिकारी तसेच एकाच ठिकाणी ठिय्या मांडून असलेल्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. विदर्भ व मराठवाड्यात सोमवारी पाच पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती.

गृहमंत्री, पोलीस महासंचालक कार्यालयात कोथमिरे यांच्याबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्यामुळे गडचिरोलीला वाचक शाखेत त्यांची बदली करण्यात आल्याचे समजते. राज्य सरकारच्या रडारवर असलेल्या अप्पर महासंचालक देवेन भारती यांच्या खास मर्जीतील समजल्या जाणाऱ्या दया नायक यांची गोंदिया जिल्ह्यात जात पडताळणी प्रमाणपत्र समितीत तडकाफडकी बदली केली होती. हे आदेश महासंचालकांच्यावतीने अप्पर महासंचालक (आस्थापना) के. के. सरंगल यांनी बदल्यांबाबतचे जारी केले होते.