
नवी दिल्ली : कोरोनाबाधित आणि कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांसमोर आता नवी समस्या निर्माण झाली आहे. अशा लोकांमध्ये गेले काही दिवस म्युकरमायकोसीस संसर्गाचा धोका वाढत आहे. आयसीएमआरने याबाबत सुचना जारी केली असून त्यात असे सांगण्यात आले आहे की अनियंत्रित मधुमेह आणि उपचाराच्या दरम्यान आयसीयूमध्ये जास्त काळ राहिलेल्या कोरोना रुग्णांवर म्युकरमायकोसीसचा उपचार वेळेवर झाला नाही, तर ते धोकादायक ठरु शकते.
म्युकरमायकोसीस संसर्गाबाबत आयसीएमआरने जारी केल्या सूचना
आयसीएमआरने नुकत्याच काही सुचना जारी केली असून त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, हा संसर्ग झाल्यास डोळे, गाल आणि नाक यांच्यावर परिणाम होतो. म्युकरमायकोसीसमुळे फुफ्फूसांना संसर्ग होतो आणि श्वासोश्वास घेण्यात अडचणी येतात.
लवकर या आजारावर उपचार केले नाही, तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असल्यामुळे त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे.
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे रुग्णातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू रुग्णाच्या नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकारशक्ती संतुलित नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते. कोरोना झाल्यानंतर बाधित व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
म्युकोरमायकॉसिसची चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, नाक दुखणे, रक्ताळ किंवा काळसर जखम ही सर्व लक्षणे आहेत.
कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण सातत्याने तपासावे. कोणत्याही औषधांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आयसीएमआरच्या निर्देशांचे पालन करावे.
