
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून त्याच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडूनही पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैशाची अफरातफर प्रकरणी आता ईडीनेही दाखल केला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा
ईडीने हा गुन्हा सीबीआयने नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. आता ईडी शंभर कोटी वसुली प्रकरण तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर या पैशाचे नेमके झाले काय? याचा तपास करणार आहे. या पैशांचा वापर कसा करण्यात आला आहे, ते हवाला मार्फत बाहेर पाठवण्यात आले का? कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली आहे का? या सर्वांचा तपास आता ईडी करणार आहे. अनिल देशमुखांच्या नातेवाईकांच्या नावे कोलकात्यातील काही शेल कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीने हा गुन्हा दाखल करताना अनिल देशमुख आणि इतर असा शब्द वापरला असल्यामुळे भविष्यात या प्रकरणात आणखी काही नावे आली तर त्यांचीही चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
