बंगालमधील भाजप आमदारांना एक्स श्रेणीची सुरक्षा, केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

पश्चिम बंगाल मधील नवनिर्वाचित भाजप आमदारांना केंद्रातील गृहमंत्रालयाने एक्स श्रेणीची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सीआयएसएफ आणि सीआरपीएफ या निमलष्करी दलातील सशस्त्र कमांडो त्यासाठी नेमले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सुरक्षा संस्थांच्या अहवालानंतर आणि विधानसभा निवडणुकांच्या नंतर बंगाल मध्ये भाजप आमदार आणि कार्यकर्ते याच्या विरुध्द उसळलेल्या हिंसेची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी बंगाल मध्ये पाठविलेल्या उच्च स्तरीय अधिकारी टीम कडून मिळालेल्या माहितीनंतर केंद्रीय गृहमंत्रालाने हा निर्णय घेतला आहे.

नवनिर्वाचित ६६ आमदारांना किमान एक्स श्रेणीची सीआयएसएफ कमांडो सुरक्षा दिली जाणार आहे. बंगाल मध्ये भाजपाचे ७७ आमदार निवडून आले आहेत. बाकीच्यांना अगोदरच केंद्रीय सुरक्षा किंवा वाय दर्जाची सुरक्षा दिली गेली आहे. विरोध पक्षनेतेपदी निवड झालेले सुवेंदू अधिकारी यांना पूर्वीच सीआरपीएफ कमांडो असलेली झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे.

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना बंगाल मध्ये निशाणा बनविले जात आहे. काही दिवसापूर्वीच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एक टीम हिंसाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेली आहे. त्यातील केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांच्या ताफ्यावर मिदनापूर जिल्ह्यात हल्ला केला गेल्याचा व्हिडीओ आला आहे. यात मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक आणि तोडमोड केल्याचे दिसत आहे. हल्ल्याच्या भीतीने ३०० ते ४०० भाजप कार्यकर्ते बंगाल सोडून आसाम मध्ये पळून गेल्याचा दावा सुद्धा केला जात आहे.