साहेब चाव्या तयार आहेत, मग या आठवड्यामध्ये करुन टाकू हा कार्यक्रम


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रविवारी झालेल्या भेटीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाची माहिती आव्हाडांनी शेअर केली आहे.

म्हाडाकडून मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मुक्कामासाठी घरे उपलब्ध करुन देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. शरद पवार यांना आव्हाडांनी दिलेले आश्वासन लक्षात होते आणि त्याची विचारणा पवारांनी केली. त्यावर आव्हाडांनी घरांच्या चाव्या तयार असल्याचे शरद पवार यांना सांगितले.


काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला. कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला”, असं ट्विट जितेंद आव्हाड यांनी केले आहे.


जितेंद्र आव्हाड शरद पवारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले की, “मी म्हटलं आपल्या तारखेची वाट पाहातोय. साहेब म्हणाले ठिक आहे. या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करुन टाकू, पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत, असं दुसरं ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

शरद पवारांसोबत झालेल्या भेटीचा फोटो देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी ट्विट केला आहे. शरद पवार यांच्यावर गेल्या महिन्यात दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यात सल्ला दिला होता. ते राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले नव्हते. शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून ते त्यांच्या कामाला पहिल्यासारखी सुरुवात करतील, असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते.