
नवी दिल्ली – पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून यापूर्वी २३ जूनला निवडणूक होईल, असे बैठकीत जाहीर करण्यात आले होते. तसेच ७ जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याचे सांगण्यात आले होते. पण ही निवडणूक कोरोनाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढाकलण्यात आली आहे. तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच निर्णय बदलण्यात आल्यामुळे पुढची तारीख जाहीर होईपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद राहाणार आहे.
तारीख जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच बदलण्यात आला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय
राहुल गांधी यांच्याकडे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी बोट दाखवण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान काँग्रस नेत्यांचे राहुल गांधी यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे नवा अध्यक्ष मिळेपर्यंत हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आले आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची संकेत मिळत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत बैठकांमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. २०१४ पासून काँग्रेसची कामगिरी खालावत असल्याची टीका होत आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी थेट गांधी घराण्याला आव्हान दिल्याने निवडणूक अटल आहे. त्यामुळे यंदा काँग्रेसचा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाण्याची शक्यता मावळली आहे. काँग्रेसला गांधी घराण्याऐवजी नवे नेतृत्व मिळाल्यास २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तगडे आव्हान मिळू शकते, असे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे.
