महानगरपालिकेच्या ‘मुंबई मॉडेल’चे नीती आयोगाकडून कौतुक


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला मुंबईत निर्माण झालेली भयावह परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मुंबईत दुसऱ्या लाटेच्या सुरूवातीला कोरोनाबाधितांच्या संख्येचा विस्फोट झाल्यामुळे बाधितांची बेडसाठी प्रचंड हेळसांड झाली. पण, नंतर विविध उपाययोजना करत आणि बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनच्या वाटपात सुसूत्रता आणत मुंबई महानगरपालिकेने परिस्थितीवर पकड मिळविण्याचे प्रयत्न केले. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ केंद्र सरकारच्या नीती आयोगानेही महानगरपालिकेच्या कोरोना व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.

मुंबईतील कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. दुसऱ्या लाटेचा अचानक उद्रेक झाल्यानंतर परिस्थिती बिकट झाली होती. पण, मुंबई महानगरपालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. त्याचबरोबर रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. याची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे कौतुक केलं आहे.

बेडचे केंद्रीय पद्धतीने वाटप करणे, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, त्याचबरोबर खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणे, यामुळे मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचे अभिनंदन, अशा शब्दात नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी मुंबई महापालिका आणि आयुक्तांचे कौतुक केले आहे.