१२ मेपासून नाशिकमध्ये कडकडीत लॉकडाऊन; महापालिका प्रशासनाचा निर्णय


नाशिक – लॉकडाउन सदृश्य कडक निर्बंध राज्यात असले, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बाधितांची वाढ यावर अपेक्षित परिणाम झाला नसल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील अनेक जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही वेगाने होत असून, कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य सुविधांवर आधीच अतिरिक्त ताण येत असून, त्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्याकडे कल वाढला असून, नाशिक शहरातही लॉकडाउन लावला जाणार आहे. हा निर्णय १२ मेपासून लागू केला जाणार आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरूवातीला नाईट कर्फ्यू व नंतर संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले. पण, त्यामुळे कोरोनाबाधितांच्या वाढीला ब्रेक लागला असला, तरी त्यामध्ये घट देखील झालेली नाही. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा संर्सग पोहोचल्यामुळे चिंता वाढल्यामुळे आता जिल्हा स्तरावर कडक लॉकडाऊनचा उपाय निवडला जात आहे. नाशिक शहरातील परिस्थितीही चिंता वाढवणारी असून, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची माहिती नाशिक महापालिका आयुक्तांनी दिली. शहरात १२ मेपासून कडक लॉकडाउन केला जाणार आहे. हा लॉकडाऊन दहा दिवसांसाठी असणार आहे. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता कडक लॉकडाऊनची सुरूवात होईल. त्यानंतर २२ मे रोजी दुपारी १२ वाजता लॉकडाउनची मुदत संपेल. या कालावधीत सर्व सेवा आणि दुकाने बंद राहणार असून, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. या काळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नसल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.