पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा


पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून 23 मे रोजी होणारी परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. तत्पूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोनामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण पाचवी आणि आठवीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. याबाबत राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

25 एप्रिलला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाणार होती. पण, परीक्षा परिषदेने ही परीक्षा शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 23 मे ही नवीन तारीख शालेय शिक्षण विभागाने निश्चित केली होती. पण, कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता आताही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. पण, परीक्षा कोरोनामुळं पुढे ढकलली होती. राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.