दिल्लीतील कोविड सेंटर उभारणीसाठी अमिताभ बच्चन यांची कोट्यावधीची मदत


देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप अद्यापही कायम आहे. त्यातच कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजन, औषधे आणि बेड मिळत नाही आहेत. अशातच अनेकजण गरजूंच्या मदतीला धावून आले आहेत. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देशाची मदत केली आहे.


दिल्ली कोविड सेंटरसाठी अमिताभ बच्चन यांनी २ कोटी रुपयांची मदत केली असून याबाबतची माहिती दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी दिली आहे. त्यांनी ट्वीट करत, अमिताभ बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटीसाठी २ कोटी रुपयांची मदत केली आहे. अमिताभ हे मला रोज फोन करुन विचारणा करत असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी त्यानंतर आणखी एक ट्वीट केले आहे. पैशाची तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि जास्तीत जास्त लोकांचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करा! असे ते मला नेहमी सांगतात. त्यांनी आम्हाला भरपूर मदत केल्याचे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.