गुजरातच्या कोविड सेंटरमधील रुग्णांवर गोमूत्र व दूधाच्या मदतीने उपचार


अहमदाबाद – गुजरातमधील आरोग्य यंत्रणांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे वानवा जाणवत असून, राज्यातील कोरोना परिस्थिती गुजरात उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर चव्हाट्यावर आली होती. गुजरातमधील परिस्थिती अद्यापही बिकट असून, अशातच राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील तेतोडा गावात गोशाळेचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. गाईचे दूध आणि गोमूत्रापासून बनवण्यात आलेल्या औषधांच्या मदतीने येथील रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

‘वेदालक्षण पंचगव्य आयुर्वेद कोविड आयसोलेशन सेंटर’ असे गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील तेतोडा गावात सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरचे नाव असून हे कोविड सेंटर ५ मे रोजी सुरू करण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात. याबद्दलची अधिक माहिती हे कोविड सेंटर चालवणारे मोहन जाधव यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांवर या कोविड सेंटरमध्ये मोफत उपचार केले जातात. आठ प्रकारच्या औषधी कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णाला दिल्या जातात. गाईचे दूध, तूप आणि गोमूत्रापासून या औषधी तयार केलेल्या आहेत. येथे कोरोना रुग्णांवर पंचगव्य आयुर्वदिक पद्धतीने उपचार केले जातात. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना गो तीर्थ दिले जाते. गोमूत्र आणि इतर वनस्पतींपासून जे बनवलेले आहे. त्याचबरोबर रुग्णांना प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही औषधी दिली जाते, जी गाईच्या दूधापासून तयार केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

दोन आयुर्वेदिक डॉक्टरांनाही गोशाळा कोविड सेंटरमध्ये नियुक्त करण्यात आलेले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर हे डॉक्टर उपचार करतात. रुग्णांना गरज भासल्यास अॅलोपॅथिक औषधीही दिल्या जातात. त्यासाठीही दोन एमबीबीएसपर्यंत शिक्षण झालेले डॉक्टर नियुक्त करण्यात आले असल्याचेही जाधव म्हणाले. बनासकांठाचे जिल्हाधिकारी आनंद पटेल या कोविड सेंटरविषयी बोलताना म्हणाले, कोणत्याही परवानगीची कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी गरज नाही. गोशाळेत सुरू असलेल्या कोविड सेंटरबद्दल माहिती देण्यात आली होती आणि त्याला परवानगीही देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.