आसामच्या मुख्यमंत्री पदासाठी हेमंत बिस्वा सरमा यांचे नाव आघाडीवर


गुवाहाटी : हेमंत बिस्वा सरमा यांचे नाव आसामच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असून आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी 11 वाजता भाजपच्या निर्वाचित सदस्यांची एक बैठक झाली असून त्यानंतर दुपारी एक वाजता एनडीएची बैठक होणार आहे. त्यावेळी हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

आसामचे सध्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनावल आणि हेमंत बिस्वा सरमा यांना दिल्लीमध्ये बोलवले होते. या दोन नेत्यांनी यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर हेमंत बिस्वा सरमा हेच आसामचे नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु झाली.

भाजपने आसाममध्ये पूर्ण बहुमत मिळवून आपली सत्ता राखली आहे. आज दुपारी गुवाहाटी येथे एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे महासचिव अरुण सिंह हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी भाजपचे आसाम प्रभारी वैजयंत पांडा हे देखील उपस्थित राहणार आहेत.

भाजपने आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा आपली सत्ता राखली आहे. 126 विधानसभा जागांपैकी 60 जागांवर भाजपने विजय मिळवला असून भाजपचे सहयोगी पक्ष आसाम गण परिषदने नऊ तर पिपल्स पार्टी लिबरलने सहा जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या आधी भाजपने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. हेमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या रोमेन चंद्र बोरठाकुर यांचा 1,01,911 मतांनी पराभव केला आणि जालुकबारी या मतदारसंघात विजय मिळवला.