लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतर, उपकरणे आणि कच्च्या मालाचा पुरवठा आवश्यक – भारत बायोटेकच्या सह-संस्थापक


नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि जॉईन्ट एमडी इला सुचित्रा यांनी युरोपियन युनियन-भारत व्यापारी गोलमेज संमेलनात बोलताना देशातील कोरोना लसीकरणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतर, महत्वाची उपकरणे आणि कच्च्या मालाचा पुरवठा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

इला सुचित्रा म्हणाल्या की, पेटंट खुले करण्यापेक्षा सहकार्य आणि कच्च्या मालाचा पुरवठा महत्वाचे आहे. त्यामुळे लसीच्या निर्मितीला गती मिळेल. ही गोष्ट साध्य झाली तर केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशातही कोरोना लसींची निर्यात करता येईल. भारतासारख्या विशाल देशात लसीकरण करायचे असेल, तर संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे.

आता अमेरिकेत भारत बायोटेकची लस ही देण्यात येत आहे आणि तिला जर युरोपमध्ये मंजुरी मिळाली तर आम्हाला आनंद होईल, अशा भावना इला सुचित्रा यांनी व्यक्त केल्या. आम्हाला युरोपियन युनियनमधील कंपन्या शैक्षणिक संस्था यांच्याशी सहकार्य करणे आणि भागीदारी करायला आवडेल, असेही त्या म्हणाल्या.

भारतातील 1.3 अब्ज लोकांसाठी प्रत्येकी दोन डोस याप्रमाणे 2.6 अब्ज डोस लागतील आणि कोणत्याही एका देशाला एकट्याने एवढ्या लसींची निर्मिती करणे शक्य होणार नाही. पण आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळाले, तर ही गोष्ट शक्य असल्याचे इला सुचित्रा म्हणाल्या. अमेरिकेने नुकतेच कोरोना लसीकरणाच्या स्वामित्वाचे अधिकार खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा आता भारतासारख्या राष्ट्रांना होणार आहे.