निरनिराळ्या आहारपद्धतींबद्दल काय आहेत आहारतज्ञांची मते?


आजकालच्या धावत्या जीवनशैलीमध्येही आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरुकता वाढताना दिसू लागली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यायाम आणि त्याच्या जोडीला परिपूर्ण आहार याबद्दल लोक जास्त काटेकोर राहू लागले आहेत. आहाराच्या बाबतीत बोलायचे झाले, तर सतत नवनवीन आहारपद्धती अस्तित्वात येत असतात. यांपैकी प्रत्येकाचे नियम वेगळे, आणि त्यामुळे होणारे फायदे आणि तोटेही वेगळे. मात्र सर्वसाधारणपणे सर्वच आहारपद्धतींना लागू पडतील असे काही प्रश्न बहुतेक सर्वांच्याच मनामध्ये येत असतात. या प्रश्नांच्या बद्दल आहारतज्ञांची मते काय आहेत हे जाणून घेऊ या.

अनेक आहारपद्धतींच्या अनुसार, सकाळचा नाश्ता भरपूर, दुपारचे जेवण त्या मानाने कमी, तर रात्रीचे भोजन अगदीच कमी ( बहुतेकवेळी केवळ सूप, किंवा एखादा हलका पदार्थ ) असावे असे म्हटले जाते. आहारतज्ञांच्या मते ही आहारपद्धती योग्य असून, रात्रीच्या शेवटच्या भोजनापासून दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळेपर्यंत सुमारे बारा तास आपले पोट रिकामे असते. दिवसभराच्या कामासाठी शरीरामध्ये ताकद आणि चैतन्य निर्माण करण्याचे काम सकाळच्या नाश्त्यामुळे होत असून, हे दिवसातील सर्वात महत्वाचे भोजन असते. दुपारचे भोजन नाश्त्याइतके भारी असून नये, तर रात्रीचे भोजन अतिशय हलके आणि झोपण्यापूर्वी किमान तीन तास अगोदर केलेले असावे. आपल्या तीनही भोजनांमध्ये कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, आणि इतर पोषक तत्वांचे उत्तम संतुलन असणेही आवश्यक असल्याचे आहारतज्ञ म्हणतात.

अनेक लोक ‘ड्राय फास्टिंग’ करण्याला पसंती देतात. चोवीस ते अठ्ठेचाळीस तास अन्नासोबत पाण्याचाही त्याग करून हे डायट केले जाते. या डायटमुळे वजन झपाट्याने कमी होत असले, तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे डायट करणे धोकादायक ठरू शकते. आहारामध्ये फळे समाविष्ट करताना सकाळी उठल्याबरोबर किंवा दुपारच्या भोजनाच्या ऐवजी खाल्ली जावीत, जेणेकरून मधल्या वेळेच्या भुकेसाठी हा आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. मात्र संध्याकाळी चारच्या नंतर फळांचे सेवन टाळले जाणे इष्ट असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. त्याचप्रमाणे केवळ जैविक आणि इम्पोर्टेड खाद्यपदार्थ सेवन करण्यापेक्षा पारंपारिक भारतीय भोजन सर्वार्थाने परिपूर्ण असल्याचेही आहारतज्ञ म्हणतात.

एखाद्या मेजवानीमध्ये भरपूर मसालेदार भोजन आणि मद्यपान केले असल्यास त्याच्या पुढच्या दिवशी शरीरामध्ये साठलेली घातक तत्वे बाहेर टाकली जाणे महत्वाचे असते. यालाच ‘डीटॉक्सिफिकेशन डायट’ म्हणतात. यासाठी पुढच्या दिवशी आहारामध्ये भरपूर पाणी, लिंबाचे सरबत, ग्रीन टी, ताजी फळे आणि सॅलड्स यांचा समावेश प्रामुख्याने केला जावा. मधुमेहींच्यासाठी त्यांच्या ब्लड शुगर लेव्हल्स पाहून आहार निश्चित केलेला असावा. सफरचंद, पपई, नाशपाती, संत्री, पेरू, मोसंबी, यांच्यासारखी ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेली फळे मधुमेहींच्या आहारामध्ये समाविष्ट असावीत. त्याचबरोबर अक्रोड, बदाम यांसारखा सुका मेवा आणि भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियांचा समावेशही मधुमेहींच्या आहारामध्ये असावा.

ऋतूमानानुसार आणि सहज उपलब्ध असणारे अन्नपदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट असणे आवश्यक असून, अन्न योग्य पद्धतीने शिजविले जाणे आणि योग्य तापमानाला असताना खाल्ले जाणेही महत्वाचे असल्याचे आहारतज्ञ म्हणतात. त्याचबरोबर भोजन करताना आपले लक्ष भोजनाकडे असून, भोजन घाईघाईमध्ये किंवा टीव्ही, मोबाईल फोन पाहता पाहता उरकले जाऊ नये. नियमित संतुलित आहाराच्या व्यतिरिक्त सप्लिमेंट घ्यायच्या झाल्यास त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतल्या जाव्यात. त्याचप्रमाणे सप्लिमेंटद्वारे शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळविण्यावर भर देण्याऐवजी ही पोषक तत्वे अन्नातून मिळविण्याला प्राधान्य दिले जाणे महत्वाचे असल्याचेही आहारतज्ञ म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment