बहुगुणकारी फालसा


फालसा हे फळ उन्हाळ्यामध्ये येणारे असून, साधारणपणे करवंदांच्या सारखे दिसणारे हे फळ आहे. मात्र याची चव करवंदाच्या पेक्षा पुष्कळच वेगळी असून, हे फळ केवळ आकाराने करवंदासारखे दिसते. हे फळ प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये पहावयास मिळते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामध्ये फिरल्याने ऊन बाधते, त्यालाच हीट स्ट्रोक असे म्हटले जाते. त्यावेळी डोके दुखणे, मळमळणे, चक्कर येणे, क्वचित उलट्या होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी फालसा या फळापासून तयार केलेले सरबत घेतल्याने हीट स्ट्रोकची लक्षणे कमी होतात. या फळामध्ये इतरही अनेक औषधी गुण आहेत.

फालसाचा रस शरीरासाठी उत्तम टॉनिक म्हणून काम करतो. वारंवार होणारा पित्ताचा त्रास या रसाच्या सेवनाने कमी होतो. पचनक्रिया सुधारणारा, बलवर्धक असा हा रस आहे. या फळामध्ये क जीवनसत्व मुबलक मात्रेमध्ये असून, याच्या नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. या फळामध्ये असलेले क्षार रक्तदाब आणि कोलेस्टेरोल नियंत्रित करण्यास सहायक आहेत.

ज्यांना श्वसनाशी निगडित काही समस्या आहेत, त्यांच्यासाठी देखील फालसाचे सेवन उपयुक्त आहे. या फळाचा रस नियमित सेवन केल्याने छातीमध्ये साठून राहिलेला कफ कमी होण्यास मदत होते. या फळाचे सेवन पोटदुखी दूर करण्यासाठीही उत्तम आहे. जर पोट बिघडून जुलाब होत असतील, किंवा अपचनामुळे पोटदुखी उद्भवली असेल, तर थोडा ओवा भाजून त्याची पूड करावी आणि ही पूड फालसाच्या रसासोबत सेवन करावी. संधीवातामुळे सांध्यांवर आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासही फालसा सहायक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment