हिंदी महासागरात कोसळले अवकाशात भरकटलेले चीनचे रॉकेट


बीजिंग : हिंदी महासागरात चीनचे एक मोठे अनियंत्रित रॉकेट The Long March 5B कोसळल्याचे वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. त्यामुळे आता हे रॉकेट कुठे कोसळणार याच्या अफवांना आळा बसला आहे. त्याचबरोबर जगाची चिंताही मिटली आहे. हिंदी महासागरात कोसळण्याच्या आधी या रॉकेटचे बहुतांश भाग हे जळून नष्ट झाले होते.

याबाबत माहिती देताना चीनच्या स्टेट मीडियाने सांगितले की, बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार, 10 वाजून 24 मिनिटांनी The Long March 5B च्या अवशेषांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला होता. नंतर या रॉकेटचे अवशेष 72.47 डिग्री पूर्व अशांश आणि 2.65 डिग्री उत्तर रेखांश या ठिकाणी पडले. हे ठिकाण मालदीवच्या पश्चिमेला काही अंतरावर आहे.

या रॉकेटचा बहुतांशी हिस्सा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना जळून खाक झाल्याची माहिती चीनच्या स्टेट मीडियाने दिली आहे. जवळपास 100 फुट लांब असलेले हे रॉकेट चार मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे प्रवास करत होते. चीनने अंतराळात तयार करण्यात येत असलेल्या स्पेस स्टेशनचा पहिला भाग या रॉकेटच्या मदतीने पाठवला होता. तियान्हे नावाचे एक स्पेस स्टेशन चीन अवकाशात उभे करत आहे.

जगभरात या रॉकेटचे तुकडे नेमके कुठे आदळणार याची माहिती नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कुठेतरी हे रॉकेट पडेल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त समुद्रात हे रॉकेट पडावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आता हे रॉकेट हिंदी महासागरात पडल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता मिटली आहे.